“ओलू”, “सुकू”, “घातकू’ कार्टून पात्रे मुलांना देणार कचरा वर्गीकरणाचे धडे
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 19 ऑक्टोबर 2022:
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमार्फत “स्वच्छ सर्वेक्षण 2023” अंतर्गत ओला व सुका कचरा याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यासाठी “स्वच्छता के दो रंग” ही मोहीम 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने मुलांमधील मोबाईल गेम्सची आवड लक्षात घेऊन हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचावे यासाठी इन्स्टाग्रामवर “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट)” हा कचरा वर्गीकरणाविषयीचा गेम महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आज लाँच करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात महत्वाचा भाग हा कच-याचे निर्मितीच्याच ठिकाणी केले जाणारे ओला, सुका व घरगुती घातक असे तीन प्रकारे वर्गीकरण असून नवी मुंबईकर नागरिक यामध्ये स्वयंस्फुर्तीने कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात.
वर्गीकरणाचा हा गेम कसा खेळायचा
या गेममध्ये ओल्या कच-यामध्ये कोणते घटक येतात व सुक्या कच-यामध्ये कोणते घटक येतात याविषयीचे मुलांचे ज्ञान जाणून घेण्यात येणार आहे. इन्स्टाग्रामवर लाँच केलेल्या “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन (सेग्रीगेट यूअर वेस्ट)” हा गेम खेळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या @nmmconline या इन्स्टाग्राम पेजवर जाऊन अथवा https://www.instagram.com/ar/634271571616316 ऑनलाईन लिंकवर जाऊन सहजपणे कचरा वर्गीकरणाचा हा गेम खेळता येऊ शकतो.
या गेमच्या सुरुवातीला लिंकवर क्लिक केल्यानंतर गेम खेळणा-या व्यक्तीच्या डोक्यावर मुकुट दिसू लागेल व त्या मुकुटाच्या एका बाजूला “ओलू” म्हणजे ओला कचरा व दुस-या बाजुला “सुकू” म्हणजेच सुका कचरा याचे आयकॉन दिसतील. मुकुटाच्या मध्यभागी एकेक करून कागद, फुले, फळे अशा साहित्याची नावे दिसतील. त्यामधील ओल्या कच-यात जाणारे साहित्य कुठले व सुक्या कच-यात जाणारे साहित्य कुठले हे ओळखून मुलांनी डाव्या किंवा उजव्या बाजूला मान झुकवली की योग्य उत्तरानुसार त्यांना मिळालेले गुण प्रदर्शित होतात. यामुळे मुलांना कोणता कचरा कोणत्या डब्यात याविषयीचे कचरा वर्गीकरणाचे आपोआप ज्ञान मिळणार असून हसत खेळत कचरा वर्गीकरणाची माहिती प्राप्त होणार आहे.
लहान मुलांमध्ये असलेली कार्टून्सची आवड लक्षात घेऊन या व्हिड़िओ क्लिपमध्ये ओल्या कच-यासाठी “ओलू” आणि सुक्या कच-यासाठी “सुकू” ही कच-याच्या डब्याच्या आकाराची दोन कार्टून पात्रे प्रदर्शित करण्यात आली होती. याव्दारे उरलेले अन्नपदार्थ, फळांच्या साली, भाज्या, फुले असा कचरा “ओलू” म्हणजेच ओला कचरा आहे आणि कागद, काच, टाकाऊ स्टेशनरी साहित्य, धातूचे साहित्य हे सर्व “सुकू” म्हणजेच सुका कचरा आहे अशी महत्वाची माहिती कार्टून्सव्दारे मुलांपर्यंत पोहचविण्यात आली होती. याशिवाय डायपर, सिरींज, सॅनिटरी नॅपकीन असे साहित्य “घातकू’ म्हणजेच घरगुती घातक कचरा आहे ही माहिती काळ्या रंगाचा कार्टून पात्र स्वरुपातील कच-याचा डबा प्रदर्शित करीत मुलांना देण्यात आलेली होती.
केंद्र सरकारच्या “स्वच्छता के दो रंग” या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याविषयी ‘ओलू’ व ‘सुकू’ या नवी मुंबई महानगरपालिकेने प्रदर्शित केलेल्या कार्टून पात्रांची मुलांमधली लोकप्रियता लक्षात घेऊन तसेच मुलांना असलेली मोबाईल गेमची आवड लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण रितीने “प्ले – वेस्ट सेग्रीगेशन” या इन्स्टाग्रामवरील खेळाची रचना करण्यात आलेली असून नवी मुंबईतील हुशार मुले स्वत: हा खेळ खेळून ओल्या कच-यात कोणते साहित्य व सुक्या कच-यात कोणते साहित्य याविषयी आपल्याला असलेल्या माहितीची खेळाव्दारे खातरजमा करून घेतलीच याशिवाय आपल्या पालकांनाही हा खेळ खेळायला लावून त्यांनाही कचरा वर्गीकरणाचे महत्व जाणवून देतील असा विश्वास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.
——————————————————————————————————