काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 19 ऑक्टोबर 2022:

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली आहे. 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची ही निवडणूक पार पडली होती. खर्गे यांच्याबरोबर माजी मंत्री आणि खासदार डॉ. शशी थरूर ही निवडणूक लढवत होते. या निवडणूकीसाठी एकूण 9 हजार 385 मतदान झाले होते त्यापैकी मल्लिकार्जुन खरगे यांना 7 हजार 897  मते तर शशी थरूर यांना 1072   मते मिळाली आहेत. तर ४१६ मते अवैध जाहीर करण्यात आली आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मल्लिकार्जून खरगे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेसमध्ये अध्यक्ष कार्यकर्ते निवडतात इतर पक्षांसारखे अध्यक्ष लादला जात नाही. काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राजकीय कारकर्दीला सुरुवात करून नगराध्यक्षपद, कामगार नेते, आमदार, खासदार, कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध खात्यांच्या मंत्रिपदावर आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. मल्लिकार्जून खर्गे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली.

——————————————————————————————————