मुंबई, 9 नोव्हेंबर 2016 / AV News Bureau :
शहरी भागांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक बस वाहतुकीच्या माध्यमातून महिलांसाठी 300 तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरी भागांमध्ये महिलाही आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेतला महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. त्यामुळे वाढत्या महिला प्रवाशांची संख्या आणि अपुऱ्या बसेसच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र महिला बसेस सुरू करण्यात येणार आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
राज्यामध्ये सध्या 27 महानगरपालिका असून यापैकी काही महानगरपालिकांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था आहे. परंतु अपुऱ्या बसेसच्या फेऱ्या आणि शहरी भागा वेगाने वाढणारी लोकसंख्या यामुळं नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला प्रवाशांना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. कित्येकदा रांगेत ताटकळत उभे रहावे लागते. हे लक्षात घेऊन 2016-17 च्या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्रामध्ये तेजस्विनी बस या नावाने महिलांसाठी स्वतंत्र बस सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. या योजनेंतर्गत 300 बसेस खरेदी करण्यासाठी अंदाजे 90 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासाठी शासन स्तरावरुन 100 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तेजस्विनीची वैशिष्ट्ये
महिलांसाठी चालविण्यात येणाऱ्या या योजनेंर्तगत सकाळी 7 ते 11 तसेच सायंकाळी 5 ते रात्री 9 या कालावधीत बसेसमधील 100 टक्के आसने महिलांसाठी आरक्षित असतील. या बसेससाठी तिकीटाचे दर संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील प्रचलित तिकीट दरानुसार असतील. तथापि तिकीटाचे दर, आसन व्यवस्था, बसेसच्या वेळा यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार संबंधित महानगरपालिकेला असतील. या योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या बसेस पर्यावरणपूरक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे,टीव्ही, सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा बसविणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासन तेजस्विनी बस असा उल्लेख असलेल्या या बसेसमध्ये प्रामुख्याने महिला चालक व वाहकांच्या सेवा देण्यात येतील.