महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे प्रतिपादन
- अविरत वाटचला न्यजू नेटवर्क
- नवी मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२
नवी मुंबई शहर स्वच्छतेवर बारकाईने लक्ष देतानाच सुशोभिकरणावरही व्यापक स्वरुपात भर दिला तर नागरिकांना आपण सर्वोत्तम शहरात राहतो याचा आनंद वाटतो आणि हेच शहर सुशोभिकरणामागील मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण 2023” मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित विशेष बैठकीप्रसंगी आयुक्तांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त बाबासाहेब राजळे तसेच इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच उंचाविणारी कामगिरी केली असून राज्यातील इतर शहरांसाठी एक उच्चतम पातळी निश्चित करून दिलेली आहे. यापुढील काळात ही कामगिरी अधिक उंचवायची असून पोल वॉल्ट क्रीडाप्रकारात ज्याप्रमाणे सरजी बुबका याने प्रत्येक वर्षी स्वत:चेच विक्रम मोडले, त्याप्रमाणे आपणही निर्धार करून आपले मानांकन उंचविण्यासाठी सज्ज व्हावे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी त्यादृष्टीने आत्तापासूनच सुरुवात करावी असे सूचित केले.
25 डिसेंबरपर्यंत सुभोभिकरणाची कामे पूर्ण करावीत यासाठी 25 डिसेंबरपासून आजपर्यंत उलट्या क्रमाने दिवस मोजून वेळेचे नियोजन करावे असेही नार्वेकर यांनी सांगितले.
उद्याने व मोकळ्या जागांचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. या अनुषंगाने सुशोभिकरण विषयक विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांचे छायाचित्रांसह सादरीकरण करण्यात आले व यामध्ये आपली कल्पनाशक्ती मिसळून नवी मुंबई शहर अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न कऱण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
यापुढील काळात नवी मुंबई क्षेत्राचा विभाग कार्यालयनिहाय पाहणी दौरा करून प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय आढावा घेणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर स्वच्छता व सुशोभिकरणातील कमकुवत बाजू असलेल्या रेल्वे स्टेशन्स आणि सायन पनवेल हायवे या महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेल्या 2 बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यादृष्टीने रेल्वे स्टेशनसाठी सिडको तसेच सायन पनवेल मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने सहकार्य घेण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.