- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२
राज्यातील खेडोपाड्यात लाल परी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला अधिकाधिक आधुनिक आणि आरामदायक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे . त्यानुसार एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार, त्या माध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वाढते इंधन दर तसेच प्रदूषणावर पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. सार्वजनिक उपक्रमातील वाहनेही इलेक्ट्रीकवर चालविण्यात येत आहेत. त्यामुळे इंधनावर होणारा प्रचंड खर्च वाढत आहे. ही बाब लक्षात घेवून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या एसटी बसेसही आता इलेक्ट्रीक पद्धतीने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज एक बैठक घेवून संबंधितांना तसे निर्देश दिले आहेत. त्यानुसार डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार आहेत. ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- बडतरर्फ कर्मचाऱ्यांना कामावर घेणार
दरम्यान,संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.