डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगणार सामने
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २७ सप्टेंबर २०२२
जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार असणा-या फुटबॉलची “17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” भारतात होत असून नवी मुंबई शहराला यजमान शहराचा (HOST CITY) बहुमान लाभला आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणा-या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज झाले आहे. ही स्पर्धा यशश्वीपणे पार पाडण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात,याबाबत महापालिका आयुक्तांनी आज विशेष बैठक घेतली.
११ ते ३० ऑक्टोबर भारतामध्ये होत असलेल्या “१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” यामधील महत्वाचे ५ सामने नेरुळ येथील डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये १२,१५,१८,२१ आणि ३० रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वाहतुक पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, क्रीडा विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे फिफाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक दिवशी 2 सामने याप्रमाणे 5 दिवस डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझिलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.
नवी मुंबई शहरामध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने “फुटबॉल फिव्हर” निर्माण व्हावा यादृष्टीने “स्वच्छ सर्वेक्षण 2023” ला याच कालावधीत सुरुवात होत असल्याने शहरातील महत्वाच्या चौकांचे व प्रदर्शनी जागांचे फुटबॉल खेळाच्या अनुषंगाने सुशोभिकरण करण्यात यावे अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.