इंटकच्या पाठपुराव्याला यश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 25 ऑगस्ट 2022
महापालिका प्रशासनात काम करताना मृत झालेल्या कामगारांच्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्वावर महापालिका प्रशासनाने सेवेत घ्यावे यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी निवेदनातून पाठपुरावा करणाऱ्या व सातत्याने शिष्टमंडळ नेवून आयुक्तांकडे मागणी करणाऱ्या नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्याची दखल घेत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सन २०१८ नंतर पहिल्यांदाच महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या १३ अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना बुधवारी अनुकंपा तत्वावर लिपीक – टंकलेखक पदाचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका सेवेत असताना ज्या अधिकारी, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे अशा अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकारचे प्रस्ताव सन २०१८ पासून प्रलंबित होते. दिवंगत महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी प्रशासन विभागास दिले होते.
मागील ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्वावरील १३ महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आहे ही समाधानाची गोष्ट असून नवनियुक्त कर्मचारी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून आपल्या पदाच्या कामाला न्याय देतील आणि उर्वरित सर्वच मृत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या परिवारालाही अनुकंपा तत्वावरील पालिका प्रशासन लवकरच न्याय देईल, असा विश्वास रविंद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.