भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल कारवाई
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 18 ऑगस्ट 2022 :
भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, देशाची सुरक्षितता, भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या दृष्टीने हानिकारक मजकूर प्रसारित करत असल्याचे आढळून आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, यूट्यूब वरील 8 वृत्तवाहिन्या आणि 1 फेसबुक खाते बंद करण्यासाठी तसेच फेसबुकवरील दोन पोस्ट हटविण्यासाठी 16 ऑगस्ट 2022 रोजी आदेश जारी केले आहेत. या 8 वृत्तवाहिन्यांपैकी 7 भारतीय तर 1 पाकिस्तानस्थित यूट्यूब वाहिनी आहे. माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 नुसार देण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीतील अधिकारांचा वापर करत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या यू ट्यूब वाहिन्यांची एकूण प्रेक्षकसंख्या 114 कोटींहून अधिक होती आणि या वाहिन्यांसाठी 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी नोंदणी केली होती.
माहितीचे विश्लेषण
भारतातील काही यूट्यूब वाहिन्यांद्वारे प्रसारित झालेल्या माहितीतून विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. बंदी घालण्यात आलेल्या यू ट्यूब वाहिन्यांवरील विविध व्हिडीओमध्ये चुकीचे दावे करण्यात आले होते. उदाहरण घ्यायचे तर, भारत सरकारने काही धार्मिक वास्तू पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत; भारत सरकारने काही धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे किंवा देशात धार्मिक युद्ध जाहीर केले आहे इत्यादी चुकीच्या बातम्या सांगता येतील. अशा मजकूरामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे.
भारतीय सशस्त्र दले, जम्मू-कश्मीर आदींबाबत खोट्या बातम्या प्रसारित करण्यासाठी देखील या यू ट्यूब वाहिन्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या बातम्यांचा मजकूर संपूर्णतः चुकीचा तसेच देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.
वृत्तनिवेदकांची बनावट छायाचित्रे आणि थंबनेल्सचा वापर
यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, ती विशिष्ट दूरचित्रवाणी वाहिनीवरून दिल्या जाणा-या बातम्या अधिकृत आणि ख-या आहेत, असे भासवून प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी वृत्तनिवेदकांची बनावट छायाचित्रे आणि संवेदनशील लघुप्रतिमा (थंबनेल्स) तसेच वाहिन्यांचे लोगो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मंत्रालयाने बंदी घातलेले सर्व यू ट्यूब चॅनल्स सामाजिक सलोखा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि भारताच्या परराष्ट्र संबंधांना घातक ठरतील असा चुकीचा आशय असलेल्या जाहिराती त्यांच्या चित्रफितींमधून दाखवत होते. यासह, डिसेंबर 2021 पासून, मंत्रालयाने आतापर्यंत 102 यू ट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि इतर अनेक समाजमाध्यमांवरील अकांऊंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
——————————————————————————————————