- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 ऑगस्ट 2022:
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतो आहे. या महोत्सवानिमित्त 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण राज्यात “स्वराज्य महोत्सव” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत आज नवी मुंबईतील शासकीय, खाजगी कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृमिक कार्य विभागाने 10 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या शासन निर्णयानूसार 17 ऑगस्ट रोजी “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा. एकाच वेळी राज्यात सर्वत्र “समूह राष्ट्रगीत गायन” करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात सकाळी 11.00 ते 11.01 या वेळेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्र येत ॲम्फिथिएटर येथे समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजच्या वेबसंवादात उपस्थिती अनिवार्य असल्याने त्यांनी मुख्यालयातील विशेष समिती कक्षात वेबसंवाद सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी यांचेसह समूह राष्ट्रगीत गायन केले.
अशाच प्रकारे महानगरपालिकेची मुख्यालयाव्यतिरिक्त असलेली सर्व कार्यालये, 8 विभाग कार्यालये, रूग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, ग्रंथालये, अग्निशमन केंद्रे अशा सर्वच कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारीवृंदाने समूह राष्ट्रगीत गायन केले. महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्येही हा राष्ट्रगीत गायन उपक्रम उत्फुर्तपणे संपन्न झाला. महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांसह समूह राष्ट्रगीत गायन केले तसेच विशेष म्हणजे कर्णबधीर विभागातील विद्यार्थी, शिक्षकांनी खुणेच्या भाषेत (साईन लँग्वेज) राष्ट्रगीत सादर केले.
कोंकण भवन येथे समूह राष्ट्रगीत गायन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत आज कोकण भवनात उप आयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली “समूह राष्ट्रगीत गायन” करण्यात आले. कोंकण भवन इमारतीत असलेल्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ मोठया संख्येने उपस्थित राहून समूह राष्ट्रगीत गायन केले.
यावेळी उपआयुक्त (महसूल) मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण (निर्धार), उपायुक्त (करमणूक) सोनाली मुळे, उपआयुक्त (वस्तू व सेवा कर) कमलेश नागरे, कोंकण विभाग नगररचनाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
समूह राष्ट्रगीत गायना नंतर ‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे कोकणभवन इमारतीचा परिसर देशभक्तीमय झाला.
——————————————————————————————————-