पनवेल येथे  “फाळणी वेदना स्मृती दिन” प्रदर्शनाचे आयोजन

विभागीय आयुक्त तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली भेट

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • अलिबाग, 15 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कोकण विभागातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये 14 ऑगस्ट  रोजी “फाळणी वेदना स्मृती दिन” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पनवेल येथील ओरियन मॉल येथे आयोजित “फाळणी वेदना स्मृती दिन” प्रदर्शनास विभागीय आयुक्त (प्र.) तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी भेट दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे, पनवेल तहसिलदार विजय तळेकर तसेच पनवेल प्रांत व तहसिल कार्यालयाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री हा सोहळा झाला. मात्र देशाची फाळणी झाल्याने लाखो जण विस्थापित झाले, अनेकांना यात प्राण गमवावे लागले. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. त्या काळी विस्थापित झालेल्या व हिंसाचारामुळे जीव गमवावा लागलेल्या साऱ्यांच्या वेदना वर्तमान व भावी पिढीला माहिती व्हाव्यात व त्याची सदैव आठवण राहावी, यासाठी हा फाळणी वेदना स्मृतीदिन घोषित करण्यात आलेला आहे. भेदभाव, वैमनस्य आणि द्वेष भावना संपविण्यासाठी प्रेरित व्हावे व एकता आणि सामाजिक सद्भावना यासोबतच मानवी संवेदना सशक्त व्हावी, या उद्देशाने हा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रदर्शनामध्ये या दिवसाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे छायाचित्रांसह माहिती देण्यात आली होती.