समुद्राच्या खारट पाण्यावर चालणाऱ्या  ‘रोशनी’ या भारतातल्या पहिल्या दिव्यांचे अनावरण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई: 13 ऑगस्ट 2022

समुद्राच्या खारट पाण्यावर चालणाऱ्या रोशनी (Saline Water Lantern) या दिव्यांचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान; पृथ्वी विज्ञान, डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे एलईडी दिवे चालवण्यासाठी इलेक्ट्रोड्समधील इलेक्ट्रोलाइटच्या स्वरुपात समुद्राच्या पाण्याचा वैशिष्टयपूर्ण रीतीने वापर करण्यात आला आहे.

डॉ. सिंह यांनी तटवर्तीय संशोधन जहाज ‘सागर अन्वेशिका’ला दिलेल्या भेटीदरम्यान रोशनी या दिव्यांचे अनावरण केले. हे जहाज राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT), चेन्नई द्वारे किनारी संशोधनासाठी संचालित आणि वापरले जाते. खारट पाण्याचे हे दिवे (Saline Water Lantern) गरीब आणि गरजूंचे  जीवन अधिक सुलभ करेल, विशेषतः भारताच्या 7500 किलोमीटर लांब सागरी किनारपट्टीनजीक राहणाऱ्या कोळी समुदायाला त्याचा लाभ होईल , असे जितेंद्र सिंह म्हणाले. रोशनी दिव्यांसह (Saline Water Lantern) उर्जा मंत्रालयाच्या सौर अध्ययन दिव्यांसारख्या योजनांमुळे नवीकरणीय उर्जा निर्मिती कार्यक्रमाला एक चैतन्य मिळेल ज्यायोगे ऊर्जा सुरक्षा, सर्वांसाठी उर्जा  आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्दिष्टांना हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांची जहाजावर भेट घेतली आणि भारताच्या डीप ओशन मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला.

खारट पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर

डॉ जितेंद्र सिंह यांनी समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने (NIOT) विकसित केलेल्या लो टेम्परेचर थर्मल डिसेलिनेशन (LTTD) तंत्रज्ञानाच्या प्रगतीचाही आढावा घेतला, जे लक्षद्वीप बेटांवर यशस्वीरित्या स्थापित केले गेले आहे.या प्लांट्सच्या यशस्वी स्थापनेच्या आधारे, गृह मंत्रालयाने लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या माध्यमातून 1.5 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचे आणखी सहा  LTTD प्लांट स्थापन करण्याचे काम सोपवले आहे, अशी माहिती डॉ. एम. रविचंद्रन यांनी डॉ. जितेंद्र सिंह यांना दिली.
——————————————————————————————————