राजापूर तालुका तहसीलदार शितल जाधव यांचे प्रतिपादन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पाचल (जि.रत्नागिरी), 3 ऑगस्ट 2022:
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानातच गुंतून राहण्यापेक्षा इतरही विषयांकडे सजगपणे पाहिले पाहिजे. चाकोरीतील विषयांमधून बाहेर पडून नवनवीन क्षेत्रांचीही ओळख करून घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. अभ्यासाच्या मर्यादा ओलांडून पुढे पाहण्यासाठी आपल्याला नवीन क्षेत्र आणि त्यातील संधींचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या आवडीनुसार करिअरची नवी क्षेत्र निवडावीत असे मत राजापूर तालुक्याच्या तहसीलदार शितल जाधव यांनी व्यक्त केले.रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल परिसरात सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे दिवंगत निर्मला रमेश हरळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम गुण मिळविणा-या पाचल पंचक्रोशीतील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल आणि शैक्षणिक साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आबा नारकर सभागृह येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहत तहसीलदार शितल जाधव यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.
यावेळी राजापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्रन परबकर, पाचलच्या सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर,सरस्वती विद्या मंदिर पाचल हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ जाधव, पाचल वापारी संघटनेचे अण्णा पाथरे,माजी सरपंच विलास गांगण, सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक अधक्ष रमेश हरी हरळकर, मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी दिलीप गडहिरे आणि डी.के. राठोड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सावित्रीच्या लेकी उपस्थित असल्याचे पाहून खूप आनंद झाल्याचे मत तहसीलदार जाधव यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, मी देखील एक स्त्री आहे. वरिष्ठ पदावर काम करताना आलेल्या अडचणींवर अनुभवातून मात करून आपले धेय्य पूर्ण करत असते. त्यामुळे आज धेय्याने झपाटलेल्या प्रगती करणा-या महिलांची संख्या वाढत आहे. अर्थातच आपले संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले यांनी आणि यांच्यासारख्या अनेक थोरामोठ्यांनी केलेली मदतच त्यासाठी जबाबदार आहे.
तहसीलदार जाधव पुढे म्हणाल्या की, प्रत्येकासमोर एक उदाहरण आहे. डॉक्टर, पोलीस, अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांकडे केवळ एक अनुभव म्हणून न पाहता, एक आदर्श म्हणून न पाहता आपणही तसे होण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सर्वांनीच तहसीलदार, पोलीस, पत्रकार होण्याची आवश्यकता नाही. एखादा चित्रकार होवू शकतो, समाजसेवेतही एखाद्याला आवड असू शकते. त्यासाठी इतर अनेक शाखा आहेत, ज्या शाखांचा आपण अभ्यास करू शकतो. त्यामुळे अभ्यासाला आणि आवडीला मर्यादा न ठेवता नवीन क्षेत्रांकडेही वळले पाहीजे, असे आवाहनही तहसीलदार जाधव यांनी मुलांना केले.
कोणत्याही शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. आपण सतत शिकले पाहिजे. माझ्या आईने वयाच्या ५५ वा वर्षी समाजसेवेची एमएसडब्लूची पदवी घेतली. तर मी आता तहसिलदार म्हणून उच्च पदावर काम करीत असतानाही विधी शाखेच्या प्रथम वर्षाचा अभास करीत आहे. त्यामुळे मी दहावी झाले, बारावी झाले आता बस.. अशी शिक्षणाला मर्यादा न ठेवता सतत काही ना काही शिकत राहीले पाहीजे. त्यासाठी आजकाल फेसबूक, यूट्यूबसारख्या समाज माध्यमांवर अनेक गोष्टी शिकवला जातात. वाचनाची आवड नसेल तर बघून शिकावे. ऐकून, वाचून आणि लिहून शिकता येते. तुम्ही कुठल्याही पद्धतीने शिकला तरी त्याचा तुम्हाला शालेय जीवनातच नव्हे तर आयुष्यातही फायदा होईल, असेही जाधव यांनी सांगितले.
शिकण्याच्या या वृत्तीमुळेच आपण नेहमी स्वत:जवळ छोटी वही आणि पेन ठेवावे. आपण जिथे जिथे जातो तिथे अनेकदा काही चांगला गोष्टी लिहिलेल्या असतात त्या आपण लिहून घ्याव्यात. तहसिल कार्यालय, पोलीस ठाण्यात गेलो तर तिथे महत्वाचे फोन नंबर लिहिलेले असतात. ते लिहून घ्यावेत. आपल्याला अशा माहितीचा नेहमीच फायदा होत असतो. म्हणून वाचा, लिहा आणि ऐका. या त्रिसूत्रीचा तुम्हाला फायदाच होईल, असेही तहसिलदार जाधव यांनी मुलांना सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील होतकरू मुलांच्या पाठीवर मिळालेली ही शाबासकीची थाप त्यांचा उत्साह वाढवणारी असते. मुलांमधला आत्मविश्वास वाढवणारी असते. रमेश हरळकर यांनी सुरू केलेला हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांशी संवाद साधता आला. एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले. यासारख्या सामाजिक कामात हरळकरांना लागेल ती मदत आम्ही करू असं आश्वासनही परबकर यांनी यानिमित्ताने दिले.
सफाई कामगार परिवर्तन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरळकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, आम्ही या मातीत जन्मलो आणि घडलो. ग्रामीण भागात शिकताना अनेक अडचणी येतात हे आम्ही अनुभवले आहे. त्या परिस्थितीतही आम्ही आमच्या मुलांना शिकवले आणि माझी मुले आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. काळ बदलला, मात्र गावांमधील परिस्थिती फारशी बदललेली नाही. आजही मुले शिक्षणासाठी 10-12 कि.मी. पायपीट करतात ही बाब चांगली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शाळा महाविद्यालयीन परीक्षांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतात ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे अशा मुलांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचविण्याचा विचार केला तेव्हा अनेक सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्ती आणि संस्था मदतीसाठी पुढे आल्या. त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम यशस्वी होवू शकला. या उपक्रमाला हातभार लावणा-या सा-यांचे मनापासून आभार. तसेच राजापूर तालुक्याच्या तहसीलदार शितल जाधव मॅडम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर सर आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांना आशिर्वाद दिले. तसेच या कार्यक्रमाची शोभा वाढविली याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. मुलांनी खूप शिकावे. आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पेनिनसुला ट्रस्ट, मुंबईचे चेअरमन सुरेश चौकाणी, अध्यक्ष धरमपाल पोतदार, जेष्ठ अभ्यासक अभिजीत साठे, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार लता मिश्रा, मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी दिलीप गडहिरे आणि डी.के.राठोड, महेश पारधे, सुनिल जाधव, नासिर खान, प्रमोद बर्डे, श्रीमती अलका भंडारे तसेच रहिसभाई सैफी, संदीप त्रिपाठी आदी मान्यवरांच्या सहकार्याने मुलांना मोफत सायकल, शैक्षणिक साहित्य, रेनकोट आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाधक्ष सुरेश गुडेकर यांनी केले.