शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे निवेदन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 जुलै 2022

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही,असेही थोरात म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत,असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

==============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप