- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 26 मे 2022
महामानवाची सावली म्हणून आदराने उल्लेखल्या जाणा-या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या 27 मे रोजीच्या 87 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात “रमाईंची संघर्ष गाधा” या विषयावर सुप्रसिध्द साहित्यिक योगीराज बागूल यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ज्ञानसूर्य उपमेला साजेसे असावे यादृष्टीने येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करून वैचारिक जागर केला जात आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून 30 मार्च पासून 22 एप्रिल पर्यंत “जागर” या उपक्रमांतर्गत मान्यवर व्याख्यात्यांची निरनिराळ्या विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्याला नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला होता.
हिच वैचारिक परंपरा कायम राखत “विचारवेध” या उपक्रमांतर्गत 26 मे 2022 रोजी माता रमाई यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र उलगडणारे विशेष व्याख्यान सायं. 7 वाजता स्मारकातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
माता रमाईंच्या जीवनाची संघर्षमय कहाणी “प्रिय रामू…” या चरित्र ग्रंथातून शब्दबध्द करणारे सुप्रसिध्द साहित्यिक योगीराज बागूल माता रमाईंचा त्यागमयी जीवन प्रवास उलगडविणार असून याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.