संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

वन्य पर्यटकांचा ओघ वाढविण्यावर भर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 11 एप्रिल 2022:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये (Sanjay Gandhi national park)  पर्यटकांना आकर्षित करणारे जगातील विविध उद्यानामधील पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. या उद्यानात पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरीकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी राबविण्यात यावेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले.

मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय उद्याना विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आदी उपस्थित होते.

विविध उपक्रम

विविध जातींचे सर्प संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या असे आपल्याकडे दुर्मिळ असणारे प्राणी या उद्यानात आणावेत. तसेच वाघांची, बिबट्या सफारीचा उपक्रम राबविण्यात यावे. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रदूषणमुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. चिल्ड्रन पार्क, बोटिंग, अद्ययावत शौचालयाची सुविधा याठिकाणी करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.——————————————————————————————————