उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 14 मार्च 2022:
14 ते 16 मार्च या कालावधीत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्ण लहर जाणवणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उत्तर पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहण्यास उशीर होत आहे. आकाशही निरभ्र असल्याने हवामानाच्या या परिस्थितीमुळे कोकणातील किनारी जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
उष्माघातापासून बचाव करण्याकरिता नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी
- या काळात दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळावे विशेषतः दुपारी बारा ते चार या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये.
- तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत
- बाहेर जाताना सनग्लासेस, स्कार्फ, छत्री, टोपी यांचा वापर करावा.
- प्रवासा दरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा
- तसेच ओल्या कपड्याने डोके, चेहरा झाकावा.
—————————————————————————————————————–