- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 फेब्रुवारी 2022:
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2021-22 चा सुधारित आणि सन 2022 – 23 चा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी आज मंजूर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले , अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु.2205.96 कोटी व रु. 2591.40 कोटी जमा आणि रु.3443.00 कोटी खर्चाचे सन 2021-22 चे सुधारित अंदाज, तसेच रु.1354.35 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु.4 हजार 910 कोटी जमा व रु.4 हजार 908.20 कोटी खर्चाचे आणि रु.1.80 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2022-23 चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचेही अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
कोणत्याही प्रकारची करवाढ न करता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राखत नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. शहर विकासाच्या नव्या संकल्पना राबविताना परिस्थितीचे भान राखणारा हा वास्तववादी अर्थसंकल्प असल्याचं महापालिका आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्प बनवताना प्राधान्याने शिक्षण, आरोग्य , पर्यावरण या तीन विभागांना महत्व देण्यात आलं आहे. पर्यावरणशील शहर निर्मितीसाठी स्वतंत्र इको बजेट मांडण्यात आले आहे. दुर्बल घटकांच्या आर्थिक, सामाजिक विकासाद्वारे सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत आहे ही महानगरपालिकेच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तसेच नवी मुंबई महानगरापालिकेचे महसूली उत्पन्न हे 8.88 % दराने वाढत आहे व खर्च 7.78% दराने वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिका बरीचशी भांडवली कामे करत असते. ही सर्व भांडवली कामे महानगरपालिका स्वत:च्या उत्पन्नामधून करीत आहे.
नवी मुंबई महानगरापालिकेने मागील 7 वर्षात एकदाही कर्ज घेतलेले नाही. घेतलेल्या कर्जाचे व्याज व मुद्दलाचे हफ्ते वेळेवर फेडत असून सद्यस्थितीत फक्त रक्कम रु.115.28 कोटी एवढेच कर्ज बाकी आहे.
नवी मुंबईत पुनर्विकास करावयाच्या जागेची मालकी सिडकोकडे असल्याची वस्तुस्थिती तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी सह निबंधकाची भूमिका महत्वाची असल्याचे लक्षात घेऊन भविष्यात प्राप्त होणाऱ्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांकरिता नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रमाणित कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे.
महापालिका बायो मिथेनायझेशन, हरित खच-यापासून बायोकोल निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जून २०२३ मध्ये यामध्ये पहिले सत्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे.
स्कॉलरशीप प्राविण्य प्राप्त महानगरपालिका विद्यार्थ्यांची भारतातील वैज्ञानिक संस्था इस्त्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) येथे शैक्षणिक सहल आयोजित करणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्वसाधारण शाळेत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अथवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे याकरीता व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
तृतीयपंथी व्यक्तींकरीता आवश्यकतेप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्वतंत्र शौचालय उभारणे, तृतीयपंथी व्यक्तींच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील आगामी काळातील प्रकल्प नियोजन :
-
- घणसोली ते ऐरोली उर्वरित पामबीच रस्ता व पूल बांधणे.
- ऐरोली काटईनाका उन्नत मार्गावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे चढ-उतारासाठी लिंक तयार करणे.
- वाशी से.17 येथील महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाणपूल पर्यंत उड्डाणपूल बांधणे.
- तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बायोगॅस / बायो सी.एन.जी. प्लांट उभारणे.
- मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (Floating Solar Project) व 1.5 मेगावॅट क्षमतेचा जलविदयुत प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महानगरपालिकेची 1 वर्षानंतर प्रतिवर्ष रक्कम रु. 20 ते 22 कोटी बचत होणार आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन ऊर्जा स्त्रोत उत्पन्न होणार असून याव्दारे पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.
- नवी मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. त्या अनुषंगाने महिला सुरक्षा प्रभावी होईल व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. सदर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा ITMS प्रणालीस जोडण्यात येणार असून त्यामुळे अपघात कमी होण्यास मदत होऊ शकेल.
- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ता यांची लिडार प्रणालीने मोजणी करणे. त्या अनुषंगाने मालमत्ता कराव्दारे मिळणा-या उत्पन्नामध्ये वाढ होणार असून अनधिकृत बांधकामांना आळा बसू शकेल. हे काम येत्या सात महिन्यात पूर्ण होणार आहे.
——————————————————————————————————