प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 11 फेब्रुवारी 2022
सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या रोलिंग स्टॉकला (कोच, इलेक्ट्रिकल इ.) भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाकडून ११ फेब्रुवारी रोजी मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई मेट्रो कार्यान्वित करण्याचा दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. नवी मुंबई मेट्रो कार्यान्वित होण्यासाठी आता केवळ स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण बाकी आहे.
“नवी मुंबई मेट्रोचे स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण पूर्ण झाल्यावर, नवी मुंबई मेट्रो, फेज 1, लाईन 1 कार्यान्वयन करण्यासाठी तयार होईल. आता नवी मुंबई मेट्रो प्रकल्प सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे.”
डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर हा एकूण 11 कि.मी. लांबीचा, 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार (डेपो) असणारा मार्ग आहे.
मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधर या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी सिडकोकतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या आतापर्यंत ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, इमर्जन्सी ब्रेक इ. महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरीत्या पार पडून त्या संदर्भातील प्रमाणपत्रही आरडीएसओकडून प्राप्त झाले आहे.
सीएमआरएस यांच्याकडून घेण्यात येणारी सुरक्षाविषयक चाचणी व त्यानंतर प्रदान करण्यात येणारे प्रमाणपत्र हे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सीएमआरएस यांच्या पथकाकडून 17 आणि 18 जानेवारी रोजी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक व संबंधित अधिकारी तसेच महा मेट्रोचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मार्ग क्र.1 वर आणि तळोजा आगार येथे मेट्रोची सुरक्षाविषयक चाचणी घेण्यात आली होती.
स्थापत्य कामांसाठीचे पर्यवेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, सीएमआरएस आणि रेल्वे मंडळ यांच्याकडून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.
========================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप