भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 11 फेब्रुवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळे झाले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते गोवा येथून व्हर्चुअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार व भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची भाषणे झाली.

फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवेला महत्त्व दिले तसे महत्त्व अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचा संस्कार हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमुळे आहे. भाजपा दीनदयाळजींच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत हे दीनदयाळजींच्या चिंतनाचे पुढचे पाऊल आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवाद आणि त्यांच्या विचारांसाठी संपूर्ण भारत त्यांचा ऋणी आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महान विचार मांडले आणि जनसंघाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान रुजवले. पक्षाच्या स्थापनेपासून सोळा वर्षे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी अपार कष्ट करून जनसंघ हा पक्ष वाढविला. माणसाला पोटाबरोबर मनाची, बुद्धीची आणि आत्म्याचीही भूक असते.

आशिष शेलार म्हणाले की, दीनदयाळजींचे विचार आजच्या राजकारणातही समर्पक ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताची निर्मिती होत आहे व त्याचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय आहेत.

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाच्या समर्पित आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजही त्यांच्या विचारांनुसार पक्षाचे कार्यकर्ते वाटचाल करत आहेत.

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आजच्या राजकारणात काही पेच निर्माण झाला तर मार्गदर्शनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार मार्गदर्शक ठरतात.

पुतळ्यासाठीच्या योगदानाबद्दल अनिल सुतार आणि बापू पाटील यांचा  प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेश पदाधिकारी जयकुमार रावल, प्रसाद लाड, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, माधवी नाईक, कृपाशंकरसिंह, आशिष कुलकर्णी, अतुल वझे, रविंद्र चव्हाण, मनोज पांगारकर, सुमंत घैसास, डी. के मोहिते, सुधाकर भालेराव व हाजी अराफत शेख उपस्थित होते.
======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप