माहिम केळवे धरणासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजना सुरू

गळतीबाबत वेळीच जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्याने अनर्थ टळला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क                                                                                               पालघर, 10 जानेवारी 2022:

पालघर जिल्ह्यातील झांजरोळी गावच्या वरच्या बाजूला असलेल्या माहिम केळवे धरणाला 8 जानेवरी रोजी भगदाड पडल्याने त्यातून पाणीगळती सुरू झाली होती. धरण ढासळल्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एन डी आर एफ ची टीम सुध्दा तैनात करण्यात आली होती. परिसरातील गावामधील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची तयारी सुध्दा जिल्हा प्रशासनाने केली होती या उपाययोजना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखीखाली गळती प्रतिबंधक कामे वेळीच जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे होणारा अनर्थ टाळता आला आहे असे कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

झांझरोळी गावाजवळील माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती लागली होती. या गळती  प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी करुन वरीष्ठ अधिकारी यांना सूचना केल्या त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटपंबधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरणाची गळती होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनला आपातकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखेखाली गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात धरण अधिक सुरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

या धरणाची पाणी साठवण क्षमता 3.15 द.ल.घ.मी आहे. धरणातून जवळपासच्या 17 गावांना पाणीपुरवठा केला जातो. धरणामध्ये सध्यास्थितीत 2.46 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक 0.50 द.ल.घ्.मी. पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा राखीव ठेवून 2.00 द.ल.घ.मी. पाणीसाठा मार्च अखेरपर्यंत कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सध्यास्थितीत धरणाच्या अन्य भागातून पाणी सोडण्याचा पर्यायाचा अभ्यास करण्यात येत आहे. यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भूसे यांनी सांगितले.

——————————————————————————————————