सिडको कोविड सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष कक्ष
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- 4 जानेवारी 2022:
मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना आढळून येत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना बाधीतांची संख्या कमी झाल्याने बंद केलेली कोविड केंद्रे(covid 19) पुन्हा सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार सध्या 3 सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत कोरोना बाधीत रुग्णांवर सेक्टर 30 वाशी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोमवार 3 जानेवारीपासून तुर्भे सेक्टर 24 येथील 349 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे राधास्वामी कोविड केअर हेल्थ सेंटर व तुर्भे एपीएमसी मार्केट येथील 312 ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे एक्पोर्ट हाऊस कोविड केअर हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याचे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. तसेच 560 ऑक्सिजन बेड्स क्षमतेची सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील कोविड केअर हेल्थ सेंटर सुविधा 4 जानेवारीपासून सुरु करण्याचे निर्देशित करण्यात आले.
सिडको कोविड सेंटरमध्ये मुलांसाठी विशेष कक्ष कार्यान्वित करण्यासोबतच आवश्यकता भासल्यास राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे निर्माण करण्यात आलेला मुलांसाठीचा विशेष कक्ष सुरु करण्यासाठी तयारीत राहण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
ओमायक्रॉन व्हेरियंट संशयीत रुग्णांना सिडको कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास त्यामध्ये वाढ करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्या अथवा लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीतांच्या विलगीकरणासाठी यापुर्वी दुस-या लाटेत कार्यान्वित असलेली सर्व कोविड केअर सेंटर्स टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे असे सूचित करण्यात आलेले आहे. याशिवाय खारघर येथील पोळ फाऊंडेशनचे कोविड सेंटर मध्ये रुपांतरीत करण्यात आलेले रुग्णालय कार्यान्वित करण्याची पूर्ण तयारी करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले.
कोविड सेंटर्स सुरु करताना त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी तातड़ीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत याकरिता वॉक इन इंटरव्ह्यू आयोजित करावा व मागील तात्पुरत्या स्वरुपाच्या भरतीच्या वेळी प्रतिक्षा यादीवर असणा-या उमेदवारांना पाचारण करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय रुग्णसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आवश्यक औषध पुरवठाही तातडीने उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
ऑक्सिजन साठा
कोविडच्या दुस-या लाटेमध्ये जाणवलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने प्रतिदिन 2 टन क्षमतेचे 4 पीएसए ऑक्सिजन प्लान्ट वाशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, बेलापूर माता बाल रुग्णालय व सिडको कोविड सेंटर येथे उभारले आहेत. याशिवाय महानगरपालिकेकडे 200 ड्युरा सिलेंडर आहेत. त्याचप्रमाणे एकूण 93 केएल क्षमतेचे (103 मेट्रीक टन) 5 लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टॅंक उभारण्यात आलेले आहेत. हे ऑक्सिजन टँक भरून ठेवावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. तसेच कोविड केअर सेंटर्समध्येही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वॉररुमही कार्यान्वित
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरव्दारे नियमितपणे कोरोना बाधीतांना संपर्क साधला जात असून कोरोना बाधीतांची वाढती संख्या लक्षात घेता कॉल सेंटर अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. वॉररुम मार्फत बेड्स उपलब्धता व रुग्णवाहिका उपलब्धतेसाठी दुस-या लाटेत अडचणीच्या स्थितीतही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली. हीच भूमिका कायम ठेवत वॉररुमही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आदेश आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
——————————————————————————————————