महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 16 डिसेंबर 2021:
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी नवी मुंबई महानगरपालिका सन्मानित होत असताना यामध्ये महत्वाचे योगदान देणा-या महानगरपालिकेत कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी संवर्गात कार्यरत असलेल्या 8 सफाई कामगारांच्या वारसांना लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगार या पदावर नियुक्तीचे आदेश बजावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अशाच प्रकारे मागील 20 हून अधिक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर / मदतनीय पदावरून 8 कर्मचा-यांना प्लंबर – फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्रणोपचारक (ड्रेसर) पदावरून 3 कर्मचा-यांना शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे. अशाप्रकारे अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणा-या 11 चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची व्यथा जाणून घेत आयु्क्तांनी त्यांच्या बढतीतील अडचण दूर करत त्यांना पदोन्नती दिली आहे. मागील 4 महिन्यात 22 संवर्गातील 122 अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे कर्मचा-यांना आपल्या सेवा कालावधीत पदोन्नतीची संधी न मिळाल्याने येणारी कुंठितता घालविण्यासाठी सातव्या वेतन आयोगाच्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेत करण्यासाठी आयुक्तांनी त्वरीत मंजूरी दिली. याचा फायदा 60 टक्के महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना होत असून त्यामधील 108 लिपिक / टंकलेखक, 9 रेकॉर्ड असिस्टंट, 2 रक्त संक्रमण अधिकारी अशा एकूण 119 कर्मचा-यांना आज आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे मागील 4 महिन्यांच्या कालावधीत 150 कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
——————————————————————————————————