ब्रिटनमधून गोठीवलीत आलेल्या दोन व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या 6 व्यक्ती कोरोना बाधित

इमारतीतील नागरिकांची 7 दिवसांनी पुन्हा चाचणी करण्याचे आयुक्तांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 डिसेंबर 2021:

घणसोलीतल्या गोठीवली भागात ब्रिटनमधून आलेल्या दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. या दोघांचे रूग्णालयीन विलगीकरण करण्यात आले असून ओमायक्रॉन व्हेरिएंटची शक्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान हा प्रवासी आणि त्याची आई कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या इमारतीत महापालिकेने चाचणी शिबीर आयोजित केलं होतं त्यामध्ये इमारतीतील प्रत्येक व्यक्ति आणि त्यांच्याकडे विविध कामांसाठी येणा-या कामगारांचे टारगेटेड टेस्टींग करण्यात आले त्यामध्ये इतर 6 व्यक्ति कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घणसोली विभागाला कार्यालयाला भेट दिली. घणसोली व नोसीलनाका या दोन्ही नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून याविषयीची सविस्तर माहिती आयुक्तांनी घेतली. या इमारतीतील नागरिकांची 7 दिवसांनी पुन्हा चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे त्या इमारतींमध्ये प्रवेश संपूर्ण प्रतिबंधित राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश घणसोली विभाग अधिका-यांना देण्यात आले आहेत.

  • अशाच प्रकारची खबरदारी परदेशातून आलेला कोणताही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याठिकाणी घेण्यात यावी .परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा जोपर्यंत ओमायक्रॉन टेस्टींग अहवाल येत नाही तोपर्यंत संशयित म्हणून शासकीय ट्रिटमेंट प्रोटोकॉल काळजीपूर्वक जपावा असे आदेश दिले.

परदेशातून प्रवास करून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस काही लक्षणे जाणवत असल्यास त्याला टेस्टींगसाठी घराबाहेर न बोलावता त्याच्या घरी जाऊन संपूर्ण काळजी घेत त्याचा स्वॅब टेस्टींगसाठी घ्यावा असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

साधारणत: 12 नोव्हेंबरपासून परदेशातून नवी मुंबईत आलेल्या प्रवाशांची माहिती महानगरपालिकेकडे असून त्यांची सूची तयार करून त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती जाणून घेण्याचेही यावेळी निर्देशित करण्यात आले. यामध्ये एकही प्रवासी राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिेले. तसेच रूग्ण आढळलेल्या प्रत्येक सोसायटीमधील प्रत्येकाची टेस्टींग होईल याकडे काटेकोर लक्ष देण्याचेही आदेशित करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, परिमंडळ उपआयुक्त अमरिश पटनिगेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील व वैद्यकीय अधिकारी, विभाग अधिकारी उपस्थित होते.

सोसायटी पदाधिका-यांना महापालिकेचे आवाहन

  • एखादा परदेशी नागरिक आपल्या सोसायटीमध्ये आल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेस 022-27567460 या क्रमांकावर त्वरित कळवावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.  मास्क हीच कोरोनापासून वाचण्यासाठी आपली सर्वात मोठी ढाल आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करावा आणि कोव्हीड लसीकरण त्वरित करून घ्यावे तसेच विविध आस्थापनांनीही मास्क आणि लसीकरण नाही तर प्रवेश नाही या तत्वाचा अवलंब करावा असे सूचित केले आहे.

——————————————————————————————————