कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला पहिला रुग्ण
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 4 डिसेंबर 2021:
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही.
२४ नोव्हेंबर रोजी या तरूणाला सौम्य ताप आला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
निकट सहवासित, सहप्रवाशी कोविड निगेटिव्ह
या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत.याशिवाय आणखी निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या 60 वर्षिय पुरूषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून मिळाला असून या रूग्णामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट आढळलेला नाही मात्र डेल्टा सबनिएज विषाणू आढळून आला आहे.
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.
——————————————————————————————————