प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालय वितरित करणार औषधे

कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिबंधक औषधे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021:

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयुष मंत्रालयाच्यावतीने ऑगस्ट 2022 पर्यंत देशभरातील 75 लाख लोकांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे वितरित केली जाणार आहेत. ज्यात वयस्कर (60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील) आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

नवी दिल्ली येथे आयुष प्रतिबंधक औषधे तसेच आहार आणि जीवनशैलीसंबंधी मार्गदर्शक तत्वे लिखित स्वरूपात वितरित करण्याची मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली.

रोगप्रतिबंधक औषधांचे किट

कोविड -19 साठी आयुर्वेद रोगप्रतिबंधक औषधांच्या किटमध्ये संशमणी वटी असते, ज्याला गुडूची किंवा गिलोय घन वटी (गुळवेल) असेही म्हणतात आणि अश्वगंधा घन वटी देखील असते. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक मेडिसिन (सीसीआरएएस) ने किट आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

रोगप्रतिबंधक औषधे तसेच आहार आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शक तत्वे वितरित करण्याची मोहीम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सव मोहिमेचा एक भाग आहे.

——————————————————————————————————