नवी मुंबईकरांना एका क्लिकवर मिळणार लसीकरणाची माहिती

कोविड पोर्टलवर विशेष सुविधा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 जुलै  2021:

नागरिकांना कोविड लसीकरणाविषयीची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिकेच्या कोविड पोर्टलवर विशेष सुविधा दिली आहे. त्यासाठी महापालिकेच्या www.nmmccovidcare.com या वेबसाईटवरील कोविड व्हॅक्सीनेशन या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर महानगरपालिकच्या कोणत्या लसीकरण केंद्रांवर, कोणत्या लसीचे, किती डोस, कोणत्या वयोगटासाठी, कोणत्या वेळेत उपलब्ध आहेत अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी निवडलेल्या लस उपलब्ध असलेल्या त्यांच्या नजिकच्या लसीकरण केंद्रांवर सहज पोहचता यावे याकरिता लसीकरण केंद्राचा पत्तादेखील या पोर्टलवर लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गुगल मॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता दुस-या दिवशीच्या लसीकरण सत्राची माहिती या विशेष पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे.

नागरिकांना आपल्या घरापासून जवळ सुलभपणे लसीकरण करून घेता यावे याकरिता महापालिका क्षेत्रात सध्या 2 ड्राईव्ह इन केंद्रांसह 78 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून अधिक लस साठा उपलब्ध झाल्यास लसीकरणाला गती देण्याच्या दृष्टीने शंभराहून अधिक लसीकरण केंद्रे लगेच कार्यान्वित करण्यासाठी संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

सध्या लसींच्या उपलब्धतेनुसार दररोज लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात येत असून दुस-या दिवशी कोणत्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे याची माहिती प्रत्येक केंद्रांवर उपलब्ध असणा-या लसींच्या डोस संख्येसह आदल्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांव्दारे तसेच व्हॉट्स अपव्दारे व्यापक स्वरूपात प्रसिध्द करण्यात येत आहे.

या https://www.nmmccovidcare.com पोर्टलवरून यापूर्वीच महानगरपालिकेच्या कोव्हीड टेस्टींग केंद्रांवर केलेल्या कोव्हीड टेस्ट्सचा रिपोर्ट COVID-19 TEST REPORTS सेक्शनमध्ये सहजपणे उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

त्याच https://www.nmmccovidcare.com पोर्टलवर आता दररोजच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती एका क्लिकव्दारे समजणार असल्याने नागरिकांना हे अत्यंत सुविधाजनक होणार आहे. नागरिक अगदी आपल्या हातातील मोबाईलवरूनही लसीकरणाविषयीची माहिती सहजपणे जाणून घेऊ शकतात.

आत्तापर्यंत 6 लाख 22 हजार 407 नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला असून 1 लाख 70 हजार 417 नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. अशाप्रकारे एकूण 7 लाख 92 हजार 824 इतके कोविड लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

——————————————————————————————————