नवी मुंबई महापालिका आणखी 500 आयसीयू बेड्स वाढविणार

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी 180 आयसीयू बेड्स राखीव ठेवणार

नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 जून 2021

कोरोनाची दुसरी लाट नवी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात काहीशी ओसरली असली तरी नवी मुंबई महापालिकेने वैद्यकीय सेवा अद्ययावत करण्यावर भर दिला आहे. कारण कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून ऐरोली आणि नेरुळ येथील रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 250 असे 500 नवीन आयसीयू बेड्स लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याच्या शक्यतेने दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 80 आयसीयू बेड्स मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी अविरत वाटचालशी बोलता दिली.

कोरनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने आरोग्य व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सुविधा अधिकाधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी खंबीर मुकाबला करण्यासाठी आयसीयू बेड्सची संख्या वाढविणे, ऑक्सिजनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणे तसेच इतर आरोग्य सुविधांची तजविज करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

  • संजय काकडे,
  • अति.आयुक्त, नवी मुंबई महापालिका

 

  • आयसीयू बेड्सची संख्या वाढविण्यावर भर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या तुलनेत आयसीय बेड्स तसेच ऑक्सिजनची पुरेशी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेआधी या गोष्टींची पूर्तता तातडीने करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या नवी मुंबई महापालिका हद्दीत खासगी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये 550 ते 600 आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 375 आयसीयू बेड्स महापालिकेच्या अखत्यारित आहेत. त्यामध्ये 200 आयसीयू बेड्स डी.वाय. पाटील रुग्णालयात, 100 एमजीएममध्ये तर 75 सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. त्यात आता मोठ्या संख्येने भर टाकण्यात येत असून ऐरोली आणि नेरुळ येथील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 250 आयसीयू बेड्स वाढविण्यात येणार आहेत.

other video on youtube

कोरोना काळात इतर आजारांवर उपचार करताना काहीशा मर्यादा येत होत्या. मात्र आता महिलांची प्रसुती तसेच मुलांच्या आजारांवरील उपचारांमध्ये अडथळा येवू नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी तुर्भे तसेच बेलापूर येथील रुग्णालयांमध्ये 75 बेड्स महिलांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

  • ऑक्सिजन निर्मितीवर भर

कोरोना काळात ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेने ऑक्सिजन निर्मितीसाठी 4 पीएसए (pressure swing adsorption oxygen plant)  प्रकल्प तयार करीत आहे. साधारणपणे 1000 मेट्रीक टन इतका हवेतून ऑक्सिजन तयार कऱण्यात येणार आहे. याशिवाय आमदार फंडातून दोन आणि महापालिकाद्वारे दोन असे चार द्रवरुप ऑक्सिजन टॅंकही लवकरच वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध होणार असून साधारण 20 किलो वजनाचे हे टॅंक सिडको एक्झिबिशन सेंटर, नेरुळ तसेच वाशी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे  काकडे यांनी सांगितले.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप