नेरुळमध्ये घराचे प्लास्टर पडून एक जण गंभीर जखमी

सिडको निर्मित निकृष्ठ इमारतीं प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 12 जून 2021

सिडको निर्मित निकृष्ठ इमारतीं प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेरुळ सेक्टर 48 मधील स्नेहमिलन सोसायटीमधील एका घराच्या छप्पराचे प्लास्टर अंगावर कोसळल्यामुळे एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे. विश्राम लोंढे (58) असे या रहिवाशाचे नाव असून जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्रक्रिया करून 20 टाके घालण्यात आल्याची माहिती त्यांचा मुलगा प्रशांत लोंढे यांनी दिली. या घटनेमुळे सिडको निर्मित घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून संबंधित प्रशासनाने सिडको  इमारतींच्या पुनर्बांधणीचा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.

नेरुळ सेक्टर 48 मधील स्नेहमिलन सोसायटीतील सी 18/1 मधील रहिवासी विश्राम लोंढे यांच्या घराच्या छप्पराचे प्लास्टर अंगावर कोसळले. आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. लोंढे कुटुंबिय झोपेत असताना ही घटना घडली.  लोंढे गंभीर जखमी झाले.  या दुर्घटनेच्या दोनच मिनिटे अगोदर त्यांची पत्नी व मुलगा उठून किचन मध्ये गेल्यामुळे ते बचावल्याचे प्रशांत लोंढे यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी स्नेहमिलन सोसायटीच्या अध्यक्षा कांचन मढवी, सोसाय़टीचे सदस्य, माजी नगरसेवक विशाल डोळस, माजी नगरसेवक भरत जाधव,भाजपा युवाचे पदाधिकारी विनायक गिरी आदींनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचा-यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याचं प्रशांत लोंढे यांनी सांगितले.

वारंवार छप्पराचे प्लास्टर पडून दुर्घटना घडत असल्यामुळे या निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचा प्रश्न सिडकोने व पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

=======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप