कामावरून कमी केलेल्या कामगारांना सेवेत घ्या
ठाणे महापालिका प्रशासनाला कामगारांचे साकडे
ठाणे, 2 जानेवारी 17/AV News Bureau :
सुधारीत वेतनापोटी थकलेली 36 कोटी रुपयांची रक्कम तातडीने कामगारांना देण्यात यावी तसेच थकीत रक्कम मागितल्याप्रकरणी कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, अशा मागण्या करीत ठाणे महापालिकेच्या सेवेत असणाऱ्या कंत्राटी कामगारांनी आज पालिका मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
ठाणे महापालिकेतील सर्व विभागतील कंत्राटी कामगाराना २४ फेब्रुवारी २०१५ रोजीचे शासकीय परिपत्रकानुसार हुद्याप्रमाणे किमान वेतन लागू करावे, महाराष्ट्र शासनाने कंत्राटी कामगारांना सुधारित वेतन देण्याचा निर्णय २४ फेब्रुवारी २०१५ रोजी घेतला असून तेव्हापासून सुधारीत वेतनातील फरकाची थकीत सुमारे ३६ कोटी रक्कम कंत्राटी कामगारांना दिलेली नाही. तसेच ही रक्कम मागणाऱ्या कंत्राटी कामगारांवर कारवाई करीत त्यांना कामावरून तडकाफडकी काढल्याचा आरोप श्रमिक जनता संघाने केला आहे. त्यामुळे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात या मागणीसाठी आज श्रमिक जनता संघाचे चिटणीस जगदीश खैरालिया यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण आंदोलन करण्यात आले. यात कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- उपोषणकर्ते कामगार
या लाक्षणिक उपोषणात जगदीश खैरालिया यांच्यासह कंत्राटी कामगार दशरथ राठोड, प्राची परब, शैलेश राठोड, नंदकुमार म्हात्रे, भास्कर शिगवण, मनोज पडवळ, किरण जगताप, सुधीर कानकोसे, अनिल तूपे, मंगेश खंडागळे यांनी दिवसभराचे लाक्षणिक उपोषण केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घंटागाडी, रस्ते सफाई, ड्रेनेज विभागातील कंत्राटी सफाई कामगार घर कचरा गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
- कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला विविध संघटनाचा पाठिंबा
या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मानवी हक्क अभियानचे दत्ता आवाड, स्वराज अभियानचे उन्मेष बागवे, संजीव साने, राष्ट्र सेवादलाचे विश्वास भोईर, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस एड. एन एम शिवकर , एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे लिलेश्वर बंसोड सहभागी झाले होते.