नवी मुंबईत ‘लोकसहभागातून व़ृक्षारोपण’

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” मोहीम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 4 जून 2021:

5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “माझी वसुंधरा अभियान अंतर्गत” नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘लोकसहभागातून व़ृक्षारोपण’ ही संकल्पना नजरेसमोर ठेवत “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” (#MyOwnOxygenBank) या शिर्षकांतर्गत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “झाडे लावूया – सेल्फी काढूया व महानगरपालिकेच्या सोशल मिडीयावर झळकूया” असे आवाहन करीत ही मोहीम राबविली जात आहे.

कोविडच्या दुस-या लाटेत ऑक्सिजनचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणा-या वृक्षांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. हे वृक्षांचे महत्व जाणत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने वृक्षारोपण करावे व त्याचे जबाबदारीने संवर्धनही करावे यादृष्टीने “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” (#MyOwnOxygenBank) ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे.

“झाडे लावूया – सेल्फी काढूया व महानगरपालिकेच्या सोशल मिडीयावर झळकूया” असे आवाहन करीत ही मोहीम राबविली जात असून नागरिकांना वृक्षारोपणाकरिता मोफत वृक्षरोपे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत उपलब्ध करून दिली जात आहेत. नागरिकांनी वृक्षारोपण करून झाडासोबतचा सेल्फी nmmcvasundhara@gmail.com या इमेल आयडीवर पाठविल्यास त्यांचा फोटो नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मिडियावर झळकविण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच वृक्षरोपे उपलब्ध करून घेण्याकरिता नागरिकांनी 022-27567064 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

तरी आपले नवी मुंबई शहर अधिक हरित बनविण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी “माझी स्वत:ची ऑक्सिजन बँक” (#MyOwnOxygenBank) या वृक्षारोपण मोहीमेत माझे झाड लावून प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
——————————————————————————————————