ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये साजरा करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 1 जून 2021:
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा शिवस्वराज्यभिषेक दिन स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
यासंदर्भातील निर्देश ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शक कर्ते ही झाले. तो दिवस आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
——————————————————————————————————