नवी मुंबईत ड्राइव्ह इन लसीकरण

वाहनात बसल्या बसल्याच होणार लसीकरण

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना दिलासा देणारा अभिनव उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 मे 2021:

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसंच 45 वर्षांवरील नागरिकांना  लसीकरणासाठी ताटकळत रांग लावयला लागू नये आणि सामाजिक अंतराचा नियमही पाळला जावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आजपासून “ड्राइव्ह इन लसीकरण” हा उपक्रम सुरु केला आहे. यामुळे गाडीत बसल्या बसल्या आरामात लस घेता येणार आहे. सीवूड नेरुळ इथल्या ग्रॅँड सेंट्रल मॉल आणि वाशी इथल्या इनॉर्बिट मॉल या दोन ठिकाणी या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रैँड सेंट्रल मॉलमध्ये 45 वर्षावरील 80 तसेच इनॉर्बिट मॉलमध्ये 66 अशाप्रकारे एकूण 146 नागरिकांनी लस घेतली आहे.

दोन्ही ठिकाणी पार्किंगच्या जागेकडे जाण्याच्या प्रवेशव्दारावर प्रत्येक वाहनाला टोकन क्रमांक दिला जात होता व टोकन क्रमांकानुसार वाहनातील 45 वर्षावरील व्यक्तींची आधारकार्ड तपासून नोंदणी करण्यात येत होती. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना पार्कींगच्या विशिष्ट जागेत निरीक्षणासाठी अर्धा तास थांबविण्यात येत होते. या अर्ध्या तासाच्या निरीक्षण कालावधीत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात होते. त्याचप्रमाणे लस घेतलेल्या व्यक्तीस काही त्रास झाल्यास हॉर्न वाजवून इशारा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

टोकन नंबर घेणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, लस घेणे व निरीक्षणासाठी अर्धा तास थांबणे ही सर्व प्रक्रिया आपल्या वाहनातून न उतरता बसल्या बसल्या होत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी संतोष व्यक्त केला.

आजपासून एपीएमसी मार्केट दाणाबाजार मध्येही विशेष लसीकरण केंद्र

सध्याचा कडक उन्हाळा व आगामी पावसाळा कालावधी लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांबाहेर शेड टाकणे, त्याठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था व पंख्याची व्यवस्था करणे अशा विविध बाबींचाही आढावा घेतला जात आहे. सध्या महानगरपालिकेची 4 रुग्णालये, सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे, वाशी सेक्टर 5 येथील जंम्बो लसीकरण केंद्र अशा 28 ठिकाणी लसीकरण सुरु असून आजपासून एपीएमसी मार्केटमध्ये दाणाबाजार येथेही विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.
——————————————————————————————————