प्लाझ्मा उपचारपध्दतीची शिफारस नको

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांचं मत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 मे 2021:

कोविड रूग्णांच्या बाबत प्लाझ्मा उपचारपध्दतीचा फार जास्त वापर नसल्याचे संपूर्ण जगभरात निदर्शनास आल्याने कोविडच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलमध्ये प्लाझ्माचा समावेश करण्यात येऊ नये तसेच कोणत्याही डॉक्टरांनी प्लाझ्मा उपचार पध्दतीची शिफारस करू नये असे मत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

कोविड विषाणूचा प्रादुर्भाव, त्याच्या लक्षणांमधील होणारे बदल तसेच त्यानुसार अंगिकारावयाची उपचारपध्दती यामधून कोरोनाविषयक उपचारांना योग्य  दिशा मिळावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड टास्क फोर्स स्थापित केला आला आहे. या टास्क फोर्सची विशेष बैठक महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आयोजित केली होती. यामध्ये, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे समवेत नायर हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ. उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़. धनवंती घाडगे सहभागी झाले होते.

सध्या दुस-या लाटेत कोविडमुळे मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तींचा अभ्यास केला असता 50 वर्षावरील रूग्णांची संख्या 80 टक्केपेक्षा जास्त दिसत असून रूग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने खालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर 50 वर्षांवरील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीस गृह विलगीकरणात (Home Isolation) न ठेवता त्यांस कोव्हीड सेंटर अथवा रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. जे रूग्ण गृह विलगीकरणात आहेत त्या रूग्णांच्या बाबत असे कोणते ट्रिगर असावेत ज्यावेळी त्यांनी रूग्णालयात दाखल होणे अनिवार्य आहे याविषयी तसेच या अनुषंगाने खाजगी डॉक्टर्स आणि सिनियर फिजीशिअन यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

रेमडेसिविर इंजेक्शनचा सुयोग्य वापर, कोव्हीड प्रतिबंधात स्टिरॉईडची उपयुक्तता, सध्याची ऑक्सिजन कमतरता पाहता HFNC (High Flow Nesal Canula) चा वापर प्रतिबंधित करणे याबाबतही चर्चा करण्यात आली.

——————————————————————————————————