18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी नेरुळ रुग्णालयात विशेष लसीकरण बूथ

कोविन ॲपवर नोंदणी व लसीकरण केंद्रावरील अपॉईंटमेंट बुकींग नंतरच होणार लसीकरण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 30 एप्रिल 2021:

उद्या 1 मे पासून तिस-या टप्यातील लसीकरणाला सुरूवात होत आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं  लसीकऱण करण्यात येणार आहे. नवी मुंबईत नेरूळ सेक्टर 15 इथल्या मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात उदयापासून लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या मजल्यावर विेशेष बूथ सुरु करण्यात येत असून याठिकाणी दुपारी 1 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे.

शासन निर्देशानुसार केवळ रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा स्वरुपातील आरोग्य संस्थांमध्येच आवश्यक जागा, मनुष्यबळ व इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता होत असल्यास लसीकरण केंद्रे स्थापन करावयाची आहेत. त्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यादृष्टीने लसीकरण केंद्रात वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्रे निर्माण करण्याबाबत वैद्यकीय अधिका-यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले होते. अशा 38 रुग्णालयांकडून लसीकरण केंद्र स्थापित करणेबाबत अर्ज प्राप्त झाले असून तेथे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक बाबींची तपासणी आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, ऐरोली व नेरुळ अशी 3 रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, 23 नागरी आरोग्य केंद्रे व इ एस आय एस रुग्णालय वाशी येथील जंबो सेंटर अशा महानगरपालिकेच्या एकूण 28 केंद्रांवर आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्ष वयावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

कोविड 19 प्रतिबंध लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करून पोर्टलवर लसीकरण केंद्र निवडायचे असून त्या लसीकरण केंद्रावर आपली अपॉईंटमेंट आरक्षित (बुकींग) करावयाची आहे. या प्रक्रियेनंतरच लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

——————————————————————————————————