काँग्रेस आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही ५ लाख रुपयांची मदत करणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  •  मुंबई, 29 एप्रिल 2021:  

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ५ लाख रूपये आणि अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना थोरात म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे आवाहन केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, धंदे, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी राज्यांना मदत करणे तर दूरच राहिले केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसेही देत नाही. अशा विपरित परिस्थितीतही काँग्रेस पक्षाच्या मागणीवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरीक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे.
——————————————————————————————————