मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 32 नागरिकांची कोविड चाचणी

कोरोना बाधित आढळलेल्या 2 रूग्णांची कोविड सेंटरमध्ये रवानगी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 एप्रिल 2021:

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीचं पालन न करता ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात फेरफटका मारणा-या नागरिकांवर नवी मुंबई महापालिका आणि पोलीस यांच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज बेलापूर विभागात 32 नागरिकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करत महापालिकेने त्यांची कोविड चाचणी केली. या चाचणीमध्ये 2 नागरिकांची कोविड चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधांनुसार संचारबंदी लागू असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. तरीही काही नागरिक मॉर्निग वॉक अथवा इव्हिनींग वॉकसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पोलीस विभागाच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिकेची पथके कारवाई करीत आहेत.

26 एप्रिलला बेलापूर विभाग अधिकारी तथा सहा,आयुक्त शशिकांत तांडेल यांनी एन.आर.आय.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करीत एन.आर.आय. संकुल परिसरात संध्याकाळी इव्हिनींग वॉकसाठी विनाकारण घराबाहेर पडणा-या 18 व्यक्तींवर कारवाई करीत प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे एकूण 18 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये अडथळा आणणा-या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई प्रमाणेच त्यांची तिथेच कोविड टेस्ट करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्याच्या अंमलबजावणीस आज सुरूवात करण्यात आली असून बेलापूर विभागात ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 32 व्यक्तींवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची तिथेच अँटिजेन टेस्टींगही करण्यात आली आहे. यामध्ये चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 2 कोरोना बाधित व्यक्तींना संबंधित करून कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.
—————————————————————————————————————————————