4 महानगरपालिका आणि 4 खाजगी रूग्णालयांत नवीन केंद्र सुरू
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 12 एप्रिल 2021:
कोविड लसीकरणासाठी कोव्हीशील्ड लसीचे डोस संपल्यामुळे मागील तीन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण आज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला आज शासनाकडून कोव्हीशील्ड लसीचे 20 हजार डोसेस मिळाले आहेत. आत्तापर्यंत महापालिका क्षेत्रात 1 लाख 44 हजार 459 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महानगरपालिकेच्या 4 बूथच्या जम्बो लसीकरण केंद्रांसह 28 रूग्णालये / नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी तसेच 21 खाजगी रूग्णालये अशा एकूण 49 कोव्हीड लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.
नागरिकांना घराच्या जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध असावे यासाठी सातत्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. आज महानगरपालिकेची 4 नवीन केंद्रे सुरू करण्यात आली असून 19 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांप्रमाणेच नेरूळ फेज 1, नेरूळ फेज 2, नोसीलनाका व महापे या चार नागरी आरोग्य केंद्रांमध्येही आजपासून लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या सर्व 23 आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
आता महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तिन्ही रूग्णालयात 24 x 7 दिवसरात्र लसीकरण केंद्रे सुरू आहेत. याशिवाय तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रात 4 बूथवर सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत 2 सत्रात लसीकरण सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
याशिवाय लसीकरण सुरू असलेल्या 17 खाजगी हॉस्पिटलमध्ये आणखी 4 खाजगी हॉस्पिटलची आजपासून भर पडलेली असून एमजीएम हॉस्पिटल सेक्टर 4 सीबीडी बेलापूर, न्यू मानक हेल्थकेअर सेक्टर 8 नेरूळ, न्यू मिलेनियम हॉस्पिटल सेक्टर 9 नेरूळ आणि क्रिटीकेअर हॉस्पिटल सेक्टर 5 ऐरोली अशा आणखी 4 खाजगी रूग्णालयांमध्येही कोव्हीड लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.
कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस 13422 नागरिकांनी घेतलेला असून आजपासून कोव्हॅक्सिनच्या दुस-या डोसलाही सुरूवात करण्यात आलेली आहे.
——————————————————————————————————-इतरही बातम्यांचा मागोवा