सागरी किनारा मार्गासाठी ‘मावळा’ सज्ज

दोन महाबोगदे खणणारे यंत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 11 जानेवारी 2021:

बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणणारे ‘मावळा’ हे संयंत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, एल अँड टी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष एस. व्ही. जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेने जगाने दखल घ्यावे असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असेच पुढे राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक ‘मावळ्यांची’ कामगिरी महत्त्वाची ठरेल.

२०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना मांडली होती. वांद्रे- वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. परंतु मुंबईत क्षितीज म्हणजे सी लिंक अशी ओळख भविष्यात होऊ नये यासाठी हा मार्ग भुयारी पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने कोस्टल रोडच्या उभारणीसाठी अप्रतिम असे नियोजन केले होते. कामही धुमधडाक्यात सुरु केले होते. परंतु मध्येच कोरोनाचे संकट आले. अजूनही ते गेलेले नाही. या काळात अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मावळा यंत्र कसे काम करणार ?

बोगदा खणणारे मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचे साधन आहे. या टीबीएम मशीनला ‘मावळा’ असे नाव देण्यात आलं आहे. हे अजस्त्र यंत्र 12.19 मीटर व्यासाचे आहे. देशात आतापर्यंत वापरण्यात येणारे सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. तयार होणाऱ्या 11 मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्याचे काम मावळा करणार आहे.

महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत.

दोन्ही बोगदे हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर असणार आहेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर इतकी असणार आहे. भारतातील महानगरांमधील रस्ते बोगद्यांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा भारतात पहिल्यांदाच बसविण्यात येणार आहे. सागरी किनारा मार्गाच्या एकूण कामापैकी २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा हा ‘सागरी किनारा मार्ग’ असेल.

—————————————————————————————————–

  • इतरही बातम्यांचा मागोवा