नवी मुंबईत कोविड १९ लसीकरणाची तयारी सुरु

 

पहिल्या टप्प्यात १६ हजाराहून अधिक कोव्हीड योध्द्यांचे लसीकरण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १९ डिसेंबर २०२०

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी अशा कोव्हीड योध्द्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या कोविड १९ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची सुयोग्य कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.

  • WATCH: Other Sotry on Youtube

कोविड १९ लसीकरण अंतर्गत पहिल्या टप्प्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या ४२ केंद्रांमधील ४४९० कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत ९०४ संस्थांतील १२४३१ कर्मचारी यांची संगणकीकृत नोंद महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

  • WATCH: Other Sotry on Youtube

लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी सक्षम पूर्वतयारी करीत हे नियोजन करण्यात आलेले असून लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर मेजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे.

कोविड १९ लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून प्रत्येक पथकामध्ये ४ व्हॅक्सीनेशन ऑफिसर व १ व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश असणार आहे. एका केंद्रावर दररोज १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

  • WATCH: Other Sotry on Youtube

या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण १७ डिसेंबर रोजी झालेले आहे. याशिवाय २२ डिसेंबरला कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, या बैठकीस वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, उपआयुक्त क्रांती पाटील, सहा. आयुक्त संध्या अंबादे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अरूण काटकर, यूएनडीपीचे प्रतिनिधी गौतम कांबळे यांच्यासह जिल्हा लसीकरण अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, विविध वैद्यकीय संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी तसेच वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रतिनिधी वेबसंवादाव्दारे उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आवश्यक बाबींची तसेच महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या तयारीची माहिती दिली.

=======================================================

  • मागील इतर बातम्यांवरही दृष्टीक्षेप