विमानासाठी 72 तास तर रेल्वेसाठी 96 तास आधी चाचणी अहवाल आवश्यक
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2020:
कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमधून येणा-या रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे येणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विमानमार्गे येणा-या प्रवाशांसाठी 72 तास तर रेल्वेमार्गे येणा-या प्रवाशांसाठी 96 तास आधीचा कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांचे कोरोना चाचणीचे अहवाल नकारात्मक आले आहेत अशाच प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.
विमानाने मुंबईत येणा-या व्यक्तिची 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असणार आहे. कोरोना चाचणी केल्याशिवाय प्रवाशांना विमानात प्रवेश मिळणार नाही. ही चाचणी न करणा-या प्रवाशांना विमानतळावर उतरल्यानंतर स्वखर्चाने ही चाचणी करावी लागणार आहे.
रस्तेमार्गे येणा-या व्यक्तिला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकार करण्यात आला नसला तरी कोरोना लक्षणासंबंधी तपासणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी जिल्हाधिका-यांनी राज्याच्या सीमेवर तपासणी यंत्रणा उभारावी अशी सूचना राज्य सरकारने केली आहे. या तपासणीत लक्षणे आढळलेल्या प्रवाशांची अॅंटिजेन चाचणी करण्यात येईल आणि त्यांच्यावर कोरोना केंद्रात उपचार केले जातील, या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशाला करावा लागेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
रेल्वेमार्गे राज्यात येणा-या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात येण्याच्या 96 तास आधी ही चाचणी करणे आवश्यक असणार आहे. कोरोना चाचणी न केलेल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणी केली जावी आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच राज्यात प्रवेश करू द्यावा असे राज्य सरकारने सांगितले आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील त्यांची रेल्वे स्थानकांवर अॅंटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. अशा प्रवाशांवर कोरोना केंद्रात उपचार केले जातील, या उपचारांचा खर्च त्या प्रवाशांना करावा लागेल असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.