नवी मुंबई महापालिकेच्या लॅबमध्ये कोविडच्या 50 हजार चाचण्या पूर्ण

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 4 नोव्हेंबर 2020:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथील अद्ययावत आर.टी.-पी.सी.आर. प्रयोगशाळेत 50 हजार कोव्हीड चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 नोव्हेबरपर्यंत या लॅबमध्ये 50 हजार 363 कोव्हीड चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत ‘ट्रेस, टेस्ट व ट्रिट’ या त्रिसूत्रीवर भर दिला. त्यासाठी आवश्यक टेस्ट्सच्या वाढीसाठी अँटिजेन टेस्ट सोबतच महानगरपालिकेची स्वत:ची आर.टी.-पी.सी.आर. लॅब सुरू करण्याकडे विशेष लक्ष दिले. लॅब उभारताना ती परिपूर्ण व उच्चतम असावी या भूमिकेतून लॅबसाठी सध्याची सर्वोत्तम व अद्ययावत उपकरणे घेण्यात आली. सतत पाठपुरावा करण्यात आला. एकाच वेळी लॅबची स्थापत्य, विद्युत कामे, उपकरणे खरेदी, त्यांची उभारणी, शासकीय परवानगी (आयसीएमआर) मिळविण्याची कार्यवाही, सक्षम अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती, उपकरणे बसविली जात असतानाच ती चालविण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण (Hands on Training) अशा विविध पातळ्यांवर कालमर्यादित पध्दतीने नियोजनबध्द कामे करण्यात आली. त्यामुळे केवळ 11 दिवसांमध्ये इतकी अद्ययावत व सुसज्ज लॅब सुरू होऊ शकली,

दररोज 1000 टेस्ट्स इतकी मोठ्या प्रमाणावर टेस्टींग क्षमता असणारी नवी मुंबई महानगरपालिकेची ही स्वयंचलित आर.टी.-पी.सी.आर. लॅब संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील स्वयंपूर्ण व सर्वाधिक अद्ययावत लॅब आहे. या लॅबमध्ये 24 तास टेस्टींग सुरू असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राप्रमाणेच शेजारील ठाणे व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 सॅम्पल्सचीही या लॅबमध्ये टेस्टींग करण्यात आली आहे.

  • सध्या या लॅबमध्ये कोव्हीड 19 संबंधित टेस्ट्स करण्यात येत असल्या तरी ‘मॉलिक्युलर डायग्नोसिस’ स्वरूपाच्या या सुसज्ज लॅबमध्ये भविष्यात स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरेसीस, एच.आय.व्ही.अशा इन्फेक्शन डिसीजेससह अगदी कर्करोगाच्या टेस्ट्सही होऊ शकतील.
  • कोव्हीडच्या एका टेस्टला खाजगी लॅबमध्ये येणा-या खर्चाशी या लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी महानगरपालिकेला येणा-या खर्चाशी तुलना केली असता, या लॅबच्या क्षमतेनुसार सुरू झाल्यापासून 1 महिन्यांच्या आतच लॅब उभारणीसाठी महानगरपालिकेला आलेल्या भांडवली खर्चाच्या रक्कमेची बचत झालेली आहे.