महिला अत्याचाराविरोधात काँग्रेसचा बुधवारी चैत्यभूमीवर धरणे आंदोलन

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ५ नोव्हेंबरला कोल्हापुरात तर शुक्रवारी ६ नोव्हेंबरला सांगलीत ट्रॅक्टर रॅली

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 3  नोव्हेंबर 2020:

भाजपा सरकारच्या कार्यकाळात महिला व दलितांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी भाजपा सरकारे त्यांना पाठीशी घालत आहेत. या अत्याचाराविरोधात उद्या बु़धवार ४ नोव्हेंबर रोजी महिला व दलित अत्याचार विरोधी दिवस पाळला जाणार असून दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भाजपाच्या अन्यायी व अत्याचारी सरकारांविरोधात चैत्यभूमीवर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

कोल्हापुरात गुरुवारी ५ नोव्हेंबरला ट्रॅक्टर रॅली

मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात काँग्रेसचा लढा सुरुच असून याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून कोल्हापुरमध्ये गुरुवारी ५ नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे.

शुक्रवारी ६ नोव्हेंबरला सांगली येथे ट्रॅक्टर रॅली-

६ नोव्हेंबर रोजी सांगली येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याविरोधात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी या रॅलीचे आयोजन केले आहे.