गर्दी टाळण्यासाठी २३ मुख्य विसर्जन स्थळांव्यतिरिक्त १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २२ ऑगस्ट २०२०

२२ ऑगस्ट रोजी श्रीगणेशोत्सवला प्रारंभ होत असून यावर्षीच्या कोव्हीड – १९ च्या पार्श्वभूमीवर साज-या होणा-या श्रीगणेशोत्सवाकरिता  नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पारंपारिक २३ विसर्जन स्थळांव्यतिरिक्त यावर्षीची कोव्हीड १९ साथरोगाची परिस्थिती विचारात घेता गर्दी पूर्णत: टाळली जावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने १३५ कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार तयार करण्यात आले आहेत. (सोबत यादी जोडलेली आहे.)

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 23 पारंपारिक विसर्जनस्थळे ( बेलापूर – 5, नेरूळ – 2, वाशी – 2, तुर्भे – 3, कोपरखैरणे – 3, घणसोली – 4, ऐरोली – 3, दिघा – 1) असून  याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार आहेत.

प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था तसेच प्रथमोपचार कक्ष असणार आहे. विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून सुविधा मंचही उभारण्यात येत आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात येत असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येत आहे. हे प्रसाद साहित्य व फळे ही गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहेत.

कन्टेनमेंट झोनमधील विसर्जनासाठी श्रीमूर्ती संकलन व्यवस्था

प्रतिबंधित क्षेत्र – ३ ( Containment Zone – 3 ) यामध्ये राहणा-या नागरिकांकडील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी या कन्टेनमेंट झोनच्या प्रवेशव्दाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने श्रीमूर्ती संकलित केल्या जाणार असून त्याचे सुयोग्य रितीने विसर्जन केले जाणार आहे.

गणेशोत्सव विषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

=====================================================

  • इतर बातम्यांचाही  मागोवा