या क्षेत्रांची आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून पाहणी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबईष 29 जून 2020:
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलती दिल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 6 हजारांपुढे गेली आहे. त्यातही मागील 15 दिवसांपासून ज्या भागांमध्ये मोठया संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा 12 दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या कालावधीत या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्टोअर व कोपरखैरणे गाव येथील प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त अमोल यादव, दादासाहेब चाबुकस्वार व डॉ. अमरिश पटनिगीरे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
कोरोना बाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेंन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या तसेच ज्येष्ठ नागरिकांची या मास स्क्रिनींगमध्ये वेगळी नोंद घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 29 जून ते 5 जुलै या काळात 10 (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली)
30 जून ते 6 जुलै या काळात 2 (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) अशा एकूण 12 भागात विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) घोषित करण्यात आली आहेत.
कोरोना मुक्तीचा “तुर्भे पॅटर्न”
यापूर्वी केंद्र सरकारच्या सूचीमध्ये तुर्भे हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. त्यामुळे या भागाकडे मागील 20-25 दिवसांपासून जास्त लक्ष केंद्रीत करीत येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोध मोहिम (Contact Tracing) वाढविण्यावर भर दिला. एका रुग्णाच्या संपर्कातील 26 व्यक्ती शोधण्यापर्यंत अतिशय बारकाईने हे काम करण्यात आले. त्याचे फलित म्हणून मागील 10 दिवसांत या भागात कोरोना बाधित आढळलेला नसून कोरोना मुक्तीचा हा “तुर्भे पॅटर्न” यशस्वी होताना दिसतो आहे. याच धर्तीवर या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधाचे (Contact Tracing) प्रमाण महापालिका क्षेत्रात सध्या 10 इतके असून ते 20 पर्यंत नेण्याचे निर्देश सर्व आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी यांना दिल्याचे आयुक्त मिसाळ यांनी सांगितले.
या मास स्क्रिनींगमध्ये जे संशयित सापडतील त्यांचे लगेच स्वॅब टेस्टिंग करुन संस्थात्मक विलगीकरण (Isolation) करण्यात येणार आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी घरात विलगीकरण करणे शक्य नसते त्यामुळे महानगरपालिका स्थापित संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे.
दोन दिवसात स्वॅब रिपोर्ट मिळण्याचे नियोजन
स्वॅब टेस्टिंगचे रिपोर्ट येण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी खाजगी लॅबशी करार करण्यात येत असून एक ते दोन दिवसात रिपोर्ट मिळेल अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात आरटीई-पीसीआर लॅब सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिसर निर्जंतुकीकरण व डासनाशक फवारणी
या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्याचा पावसाळी कालावधी लक्षात घेऊन मलेरिया, डेंग्यू व इतर साथरोग वाढू नयेत अशाप्रकारे सर्व ठिकाणी फॉगिंगही करण्यात येत आहे.
——————————————————————————————————-इतर बातम्यांचा आढावा