आयआयटी मुंबई यांच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी (डीबीबी) विभागाचा प्रकल्प
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2020
आयआयटी मुंबई यांच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी (डीबीबी) यांना मिळालेल्या अनुदानातून कोरोना विषाणूचे मुख्य प्रवेशव्दार असलेल्या नाकपुड्यांच्या आतल्या भागावर लावण्यासाठी जेल विकसित करण्यात येत आहे. या शोधामुळे केवळ आरोग्य कर्मचारी वर्गाची सुरक्षा होवू शकेल, अशी हमी नसली तरीही कोविड-19 चा सामुदायिक प्रसार कमी होवू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
कोरोनाचा विषाणू पसरू नये आणि तो पकडणे शक्य व्हावे तसेच त्याला निष्क्रीय करता यावे, यासाठी अनेक संस्था, संशोधक कार्य करीत आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), आयआयटी मुंबई यांच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी (डीबीबी), संयुक्त विद्यमाने कोविड-19 चा कारक घटक शोधण्यात येत आहे. कोविड-19 चे संक्रमण लक्षात घेतले तर या रुग्णांची काळजी घेत असताना डॉक्टर आणि परिचारक यांच्या आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही वाढते.
सार्स-कोव्ही-2 या विषाणूंचा प्रसारामागची कारणे लक्षात घेवून कोविड-19 प्रसार मर्यादित करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला जात आहे. हे विषाणू प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांमधल्या पेशींमध्ये पुन्हा तयार होत आहेत. त्यामुळे त्यांना फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते नाकामध्येच निष्क्रिय करण्याची आवश्यकता आहे.
जैविक रेणू एकत्रित करून त्या विषाणूंना निर्मलकाच्या मदतीने निष्क्रिय करणे शक्य आहे, असा विचार करून नाकातल्या मधल्या पोकळीमध्ये म्हणजेच नाकपुड्यांमधल्या जागेत लावण्यासाठी जेल विकसित करता येईल, असा विचार यामागे आहे.
डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले की, ‘‘आपले आरोग्य सेवा कर्मचारी आणि विषाणूंच्या विरोधात लढत असलेले पहिल्या फळीतले इतर मंडळी यांच्या संरक्षणाची हमी 200 टक्के महत्वाची आहे. त्यामुळे नाकांच्या आतमध्ये लावण्यासाठी जे जेल विकसित करण्यात येईल, त्यामुळे आणि इतर गोष्टींमुळे संरक्षणात्मक अतिरिक्त स्तर प्रदान होवू शकणार आहे.’’
आयआयटी मुंबई यांच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातले प्रा. किरण कोंडाबागिल, प्रा. रिंटी बॅनर्जी, प्रा. आशुतोष कुमार आणि प्रा. शामिक सेन या प्रकल्पामध्ये सहभागी झाले आहेत. विषाणूशास्त्र, संरचनात्मक जैवशास्त्र, जैवभौतिकी, जैवसामुग्री आणि औषध वितरण या क्षेत्रातील तज्ञांच्या कौशल्याअनुसार आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आगामी 9 महिन्यांमध्ये असे जेल तयार होईल, अशी अपेक्षा आहे.
———————————————————————————————