महापालिकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन

31 डिसेंबर ते 2 जानेवारी काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नवी मुंबई , 30 डिसेंबर 2016/AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिकेचा 25 वा वर्धापन दिन 1 जानेवारी 2017 रोजी साजरा करण्यात येणार आहे.  या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

1 जानेवारी 1992 रोजी ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रुपांतर होणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. स्वत:च्या मालकीचं धरण असणारी पहिली जलसंपन्न महानगरपालिका, देशातील सर्वोत्तम जमीनभरणा पध्दतीवर आधारीत शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी शुध्द करणारी पर्यावरणपुरक सी-टेक मलप्रक्रिया केंद्र, वंडर्स पार्क – रॉक गार्डन – ज्वेल ऑफ नवी मुंबई अशा 195 हून अधिक उद्यानांची गार्डन सिटी, गुणवत्तापूर्ण दरवर्षी पटसंख्येत वाढ होणारं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्हिजन, एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारं इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र, त्रिस्तरीय आरोग्य सेवा, प्रवाशांसाठी उपयोगी एन.एम.एम.टी. बस सेवा, महिला – बालकं – मागासवर्गीय व्यक्ती – ज्येष्ठ नागरिक यांच्याकरीता 50 हून अधिक कल्याणकारी योजना राबविणारी अग्रगण्य महानगरपालिका, वास्तुरचनेचा देशातील उत्तम नमुना ठरणारी ग्रीन बिल्डींग गोल्ड मानांकीत मुख्यालय वास्तु व त्यापुढील देशातील सर्वात उंच प्रतिक चिन्ह स्वरुपातील राष्ट्रध्वजस्तंभ, ई-गव्हर्नन्सव्दारे 21 प्रकारच्या नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारी व वेबसाईटसह मोबाइल ॲपवर कर भरणा सुविधा देणारी अग्रगण्य महानगरपालिका अशा विविध प्रकल्प, लोकोपयोगी कामांनी नवी मुंबई महानगरपालिकेनं स्वत:ची वेगळी ओळख अधोरेखीत केली आहे.

  • नववर्षाच्य स्वागतासाठी पालिका मुख्यालयाजवळ रोषणाई आणि आतषबाजी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 25 व्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाचं औचित्य साधून 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत महानगरपालिका मुख्यालय इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसंच 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता नववर्षारंभ दिनानिमित्त व महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त नेत्रदिपक शोभिवंत आतषबाजी केली जाणार आहे.

  • महापालिका कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम

1 जानेवारी 2017 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंदाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.  सकाळी 11 वाजता रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाचा समारंभ महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी खासदार राजन विचारे, आ.मंदा म्हात्रे, आ. संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील, उपमहापौर  अविनाश लाड, महापालिका आयुक्त  तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते  जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेते  विजय चौगुले आणि महापालिका पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • कलाधिष्टित महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यक्रम

रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबईकर नागरिकांसाठी भारतीय लोकसंस्कृतीचा गीत नृत्यमय संगीत सोहळा “कलाधिष्ठित महाराष्ट्र” या विशेष कार्यक्रमाचं सायंकाळी 7 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नसून नवी मुंबईकर नागरिकांनी रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी व्हावे असे  आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे.