गणेशोत्सवासाठी कोकणातील जाणा-या भाविकांना टोलमाफी


गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २७ ऑगस्ट २०१९

गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्यात येणार आहे. त्यासाठी टोल माफीचे पासेस दिले जाणार आहेत. तसेच मुंबई- गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे २७ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोकण भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीची कामे 100 टक्के पूर्ण झाली असून रायगड आणि रत्नागिरी जिल्हयातील १५ ते २० किलोमीटरच्या तुकड्यामधील काही कामे अपूर्ण आहेत ती देखील पूर्ण करण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे कोकणातील रस्ते खराब झाले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहे. किरकोळ दुरुस्तीची कामे सुरु असून तीही तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्या असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे कोकणातील भात पिकाचे नुकसान झाले असून त्याला तिप्पट दर मिळावा अशी आमची मागणी आहे. याचा निर्णय एक आठवडयात होईल. कोकणातील पुरपरिस्थितीमध्ये बाजारपेठा पाण्यात बुडाल्या होत्या. त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन निर्णय येत्या एक ते दोन दिवसात निघेल. लहान व्यापा-यांना नुकसान भरपाई म्हणून 75 टक्के रक्कम किंवा 50 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल. पुरामुळे मातीची घरे पडतात. याबाबतच्या नुकसान भरपाई बाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल. केळी पिकाच्या पुर्नलागवडीसाठी 1 लाख 10 हजार तर भात पिकासाठी 10 हजार अनुदान सध्या देण्यात येते. कृषी विभागामार्फत दुबार पिक पेरणीसाठी बियाणे दिली जाणार असून फळबागांच्या पुर्नजीवनासाठी योजना राबविण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

================================

इतर बातम्यांचाही मागोवा