अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २४ जुलै २०१९
सध्या पावसाळा कालावधीत हिवताप व डेंग्यु आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्याआधी पासूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना व मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहिम घेऊन दूषित स्थाने नष्ट करण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे सायंकालीन डास सर्वेक्षण करुन अधिक डास घनता असलेल्या कार्यक्षेत्रातील बंद गटारांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात येत आहे. तसेच त्यानंतर बंद गटारांच्या लाद्या उघडून डासअळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. अशा कार्यक्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा डास अळी नाशक फवारणी करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.
आपल्या क्षेत्रात डासांचा प्रादूर्भाव होऊ नये तसेच हिवतापाचे संक्रमण होऊ नये याकरिता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज असून, आपल्या गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स अशी पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे नष्ट करावीत, फुलदाण्या ट्रे फेंगशुई यामध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा बदलावे, घरामधील व घराबाहेरील पाणी साठविण्याचे ड्रम/टाक्या/ भांडी आठवडयातून एकदा पाणी पूर्णपणे काढून कोरडे करावे, शक्य झाल्यास डास प्रतिबंधात्मक मच्छर दाणीचा वापर करावा, आपल्या घरी येणारे आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये / दवाखान्यांमध्ये तापाच्या रुग्णाची मोफत रक्त तपासणी करुन घ्यावी, आपले घर, कार्यालय, व परिसर येथे पाणी साचू देऊ नये असे आवाहन करतानाच हिवताप / डेंग्यू आजाराचा रुग्ण आढळल्यास नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयात / दवाखान्यात तातडीने संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
- आपल्या नवी मुंबई शहराचे सामजिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
=====================================================
इतर बातम्यांचाही मागोवा