- नवी मुंबई काँग्रेस सचिव विरेंद्र म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
अविरत वाटताल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ११ जुलै २०१९
नेरुळ पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीरपणे फोफावलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची होणारी कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास यापार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घराकडे परतणाऱ्या नागरिकांचा रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोंढा बाहेर येतो. मात्र रेल्वे स्थानकाच्या बाहेर रस्त्यालगतच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. याबाबत नागरिकांनी नवी मुंबई काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांच्याकडे याबाबत गाऱ्हाणे मांडले. नागरिकांची तक्रार तातडीने महापालिका यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हात्रे यांनी लेखी निवेदन देऊन याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली होती. तसेच याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता.
- अखेरीस गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुलडोझरच्या सहाय्याने पदपथावरील अनधिकृत बांधकामे हटवली आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली. महापालिकेच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र यापुढेही महापालिकेने फेरीवाले पुन्हा बसू नये यासाठी लक्ष ठेवावे, अशी मागणी विरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.