अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 9 जुलै २०१९ :
नवी मुंबईत काल सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने बोनसरी परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी घुसले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज सकाळी या परिसराची पाहणी केली. या पूरग्रस्त परिस्थितीला कारणीभूत असणा-या महावीर क्वॉरी या दगडखाण मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी अविरत वाटचालशी बोलताना दिली.
तुर्भे विभागातील बोनसरी आणि इंदिरानगर परिसरात असलेल्या क्वॉरीवरून वाहत येणा-या पाण्यासोबत क्वॉरीतील दगड, डेब्रीजही वाहून आले. ही सगळी घाण इथल्या मुख्य नाल्यात अडकून पडली. दगडखाम मालकांनी नाले बुजवल्यामुळे त्याचा परिणाम परिसरात सर्वत्र पाणी साचले. इंदिरानागर परिसरातील पेन्टर शेठ व ओमकार शेठ क्वॉरी जवळील भागातील सुमारे १५ घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले. प्रकरणाचे गांभिर्य पाहून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सकाळीच बोनसरी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संबंधित क्वारींविरोधात डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत त्वरीत गुन्हा दाखल करावा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, आगामी काळात पाणी साचणाऱ्या शहरातील सर्व भागांची नियमित पाहणी करून पाणी साचू नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करा आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी विभागाला केल्या आहेत.